आयुष्मान भारत कार्ड मोहिमेवर वितरीत करा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश
पुणे : जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार व मोफत आरोग्य सुविधा मिळण्यासाठी ‘आयुष्मान भारत कार्ड’ मोहीम स्तरावर उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळतात. या योजनेचा लाभ घरोघरी पोहोचवण्यासाठी महसूल, ग्रामविकास व आरोग्य विभागाने एकत्रितपणे कार्ड नोंदणी आणि वितरणाची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच आशा कार्यकर्त्यांना वेळेवर भत्ते देणे, महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत रुग्णालये संलग्न करणे आणि क्षयरोगमुक्त ग्राम संकल्पना राबवण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
ग्रामीण भागात गरोदर महिलांची शंभर टक्के प्रसूती शासकीय रुग्णालयांत व्हावी, यासाठी सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे आदेश त्यांनी दिले. यासोबतच पावसाळ्यात कीटकजन्य व जलजन्य आजार रोखण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याचे सांगत आरोग्य सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. सीईओ गजानन पाटील यांनी एचपीव्ही लसीकरण आणि आशा कार्यकर्त्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिले.