पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या तसेच हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या एका गुंडाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. बौध्दनगर परिसरातील सार्वजनिक रोडवर रविवारी (दि. २६ एप्रिल) रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
अविनाश प्रकाश माने (वय २६, रा. बौध्दनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई समीर लक्ष्मण ढवळे यांनी रविवारी (दि. २६ एप्रिल) रोजी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश माने याला पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांनी तडीपार केले आहे. असे असतानाही २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास तो एमआयडीसी परिसरात हातात लोखंडी तलवार घेऊन फिरताना आढळला. आरोपीने तडीपारीच्या आदेशासोबतच पोलीस आयुक्तांनी लागू केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचेही उल्लंघन केले आहे. कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याच्या उद्देशाने तो तिथे उभा होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
पिंपरीत तडीपार गुंडाला तलवारीसह अटक
