ध्रुव राठीला दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका; वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी 15 दिवसांत निर्णयाचे निर्देश

नवी दिल्ली : प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी याला वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार देत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने सरकारी तक्रार निवारण अपील समितीला (GAC) संबंधित अपीलावर 15 दिवसांच्या आत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, न्यायालयाच्या आदेशांचे कोणतेही उल्लंघन गंभीरतेने घेतले जाईल, असा इशाराही दिला आहे.

हे प्रकरण ध्रुव राठीने 21 मार्च रोजी यूट्यूबवर अपलोड केलेल्या ‘हिंदू गोमांस खाऊ शकतात का? केरळ स्टोरी 2 पर्दाफाश’ या व्हिडिओशी संबंधित आहे. या व्हिडिओमधील काही आशयामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत व्हिडिओ हटविण्याची मागणी करण्यात आली होती.

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला की, संबंधित व्हिडिओमध्ये प्रभू श्रीराम, माता सीता आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याबाबत आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला असून, त्यामुळे लाखो हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी सरकारी तक्रार निवारण अपील समितीला या प्रकरणावरील अपीलाचा 15 दिवसांत निकाल देण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर न्यायालयाने ध्रुव राठीला कोणताही तात्पुरता दिलासा देण्यास नकार दिला.

या आदेशामुळे आता सर्वांचे लक्ष GAC च्या निर्णयाकडे लागले असून, या प्रकरणाचा पुढील कायदेशीर प्रवास आगामी काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *