Delhi-‘नीट पेपरफुटीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई; तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या खासदारांच्या बैठकीत सरकारची भूमिका स्पष्ट केली. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

बैठकीनंतर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, पेपरफुटीची माहिती समोर येताच केंद्र सरकारने तातडीने कारवाई केली. या प्रकरणात आतापर्यंत १३ जणांना अटक करून तुरुंगात पाठविण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नीटची पुनर्परीक्षा प्राधान्याने घेण्यात आली आणि त्याचे निकालही विलंब न करता जाहीर करण्यात आले.

याशिवाय भविष्यात अशा प्रकारच्या पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक दोषीला अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळणाऱ्यांना देशातील सर्वोत्तम कायदेतज्ज्ञांच्या मदतीने कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांनी एनडीए खासदारांना संबोधित करताना सांगितले की, “तरुणांच्या भविष्याशी कुणालाही खेळू दिले जाणार नाही. भविष्यात पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्राने राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. हा पक्षीय राजकारणाचा विषय नसून राष्ट्रीय हिताचा प्रश्न आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *