पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे येथे पैसे मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला एका डॉक्टरने दगडाने मारहाण करून जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास घडली आहे.
महेश जोगदंड (रा. निरामय हॉस्पिटल समोर, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. किरण लहू गावडे (वय २५, रा. वाघोली, पुणे) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) रोजी यासंदर्भात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास फिर्यादी किरण गावडे हे त्यांचे थकीत पैसे मागण्यासाठी डॉक्टरकडे गेले होते. त्यावेळी आरोपीने ‘मी तुझे पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर, मी बीडचा आहे, तुला काय करायचे ते कर’ असे म्हणत वाद घातला. तुम्ही कुठले का असेना, माझे पैसे मला द्या, असे फिर्यादी म्हटल्याने बाचाबाची वाढल्यानंतर डॉक्टरने जमिनीवर पडलेला दगड उचलून किरण यांच्या डोक्यात मारल्याने ते गंभीर जखमी झाले. तळेगाव दाभाडे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
तळेगावात डॉक्टरकडून तरुणाला दगडाने मारहाण
