४५ रुपयांच्या बिलावरून नडला; पोलिसांच्‍या जाळ्यात अडकला आरोपीकडून गावठी पिस्तुल जप्त

पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – चहाचे अवघे ४५ रुपयांचे बील देण्‍यावरून आरोपी टपरी चालकाला नडला. त्‍यास आपल्‍या साथीदारांच्‍या मदतीने बेदम मारहाण केली. मात्र पोलिसांनी आरोपीच्‍या मुसक्‍या आवळल्‍यानंतर त्‍याच्‍याकडे बेकायदेशीर पिस्‍तुल मिळून आले. ही घटना ताथवडे येथे शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) रोजी घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्‍यात आरोपीच्‍या विरोधात दोन वेगवेगळे गुन्‍हे दाखल करण्‍यात आले आहेत.
महेश गंगाधर साळवे (वय २६, रा. मुंजोबानगर, वाकड) असे अटक करण्‍यात आलेल्‍या मुख्‍य आरोपीचे नाव आहे. त्‍याच्‍यासोबत टपरी चालकाला मारहाण केल्‍याप्रकरणी त्‍याचे दोन साथीदार (नाव, पत्‍ता माहिती नाही) यांच्‍या विरोधातही गुन्‍हा दाखल केला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २४ एप्रिल) रोजी पहाटे पाच वाजताच्‍या सुमारास ताथवडे येथील डिकॅथलॉनसमोरील टपरीवर आरोपी आपल्‍या साथीदारांसह आला होता. त्याने नाश्ता आणि चहा घेतल्यानंतर टपरीवरील आचारी अनिल काशीनाथ काळगे (वय २५, रा. रहाटणी) यांनी ४५ रुपयांचे बिल मागितले. यावरून संतापलेल्या साळवे व त्याच्या साथीदारांनी काळगे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर टपरीवरील कांदा कापण्याचा लाकडी ठोकळा डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले.
घटनेनंतर वाकड पोलिसांनी तपास सुरू करत आरोपी महेश साळवे याला जेएसपीएम कॉलेजच्या मागील मैदानातून ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून ४५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *