पिंपरी-चिंचवड:
वाकडमधील अत्यंत सुरक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या ‘पार्क स्ट्रीट’ सोसायटीत एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला आहे. एका ३४ वर्षीय महिलेला आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून फोन करून तब्बल ५ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. “मागणी पूर्ण न केल्यास तुला आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकू,” अशी थेट धमकी कुख्यात ‘अर्जुन बिश्नोई गँग’च्या नावाने देण्यात आल्याने वाकड परिसरासह संपूर्ण औद्योगिक पट्ट्यात खळबळ उडाली आहे.
*अर्ध्या तासाच्या फरकाने पती-पत्नीला धमक्या; आंतरराष्ट्रीय कनेक्शन!*
या घटनेचा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. पीडित महिलेचे पती सध्या कामानिमित्त दुबईत आहेत. गुरुवारी या महिलेला धमकीचा फोन येण्याच्या अवघ्या अर्धा तास आधी, तिच्या पतीला दुबई येथे असाच ५ कोटींच्या खंडणीचा फोन आला होता. पत्नीने तातडीने फोन करून याबाबत आपल्या पतीला सावध केले होते. मात्र, तोपर्यंत आरोपींनी थेट वाकड गाठून तिच्या मोबाईलवरही मृत्यूचा विळखा घालणारी धमकी दिली. अर्ध्या तासाच्या आत आंतरराष्ट्रीय पातळीवर घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे.
*तळेगावमध्ये मोठे गोदाम; स्टील उद्योग टार्गेटवर?*
पीडित महिलेच्या पतीचा मोठा स्टीलचा उद्योग असून, मावळ तालुक्यातील तळेगाव येथे त्यांचे एक मोठे व्यावसायिक गोदाम आहे. या मोठ्या उद्योगाचा आणि आर्थिक सुबत्तेचा सुगावा लागल्यानेच बिश्नोई गँगने या कुटुंबाला टार्गेट केल्याचा संशय व्यक्त होत आहे. दुबई ते थेट तळेगाव आणि वाकडपर्यंत आरोपींनी पाळत ठेवून हा कट रचल्याचे स्पष्ट होत आहे.
*बिश्नोई गँगचे सावट; पोलिसांची झोप उडाली*
यापूर्वी रावेत आणि नेहरूनगरसह शहरातील काही बड्या व्यावसायिकांना बिश्नोई गँगच्या नावाने खंडणीचे फोन आले होते. केवळ फोन करून ही टोळी थांबली नव्हती, तर खंडणी न दिल्याने संबंधित व्यावसायिकांच्या आस्थापनांवर थेट गोळीबार करून दहशत निर्माण करण्यात आली होती. तोच पॅटर्न आता वाकडमधील या प्रकरणातही पाहायला मिळत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
*गुन्हे शाखा आणि सायबर सेल हायअलर्टवर*
या घटनेमुळे शहरातील उद्योजक आणि उच्चभ्रू वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून आलेल्या या फोनचा मुख्य सूत्रधार कोण? याचा शोध घेण्यासाठी वाकड पोलिसांसह पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा आणि सायबर सेलचे विशेष पथक रात्रीचा दिवस करत आहे. या आंतरराष्ट्रीय धमकी सत्रामागे मूळ बिश्नोई गँग आहे की स्थानिक पातळीवरून कोणी बिश्नोई गँगच्या नावाचा वापर करून हा कट रचला आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेतhu
