‘भीतीदायक’ ते ‘जनस्नेही मित्र’; आयकर विभागाच्या कार्याचे राज्यपालांकडून कौतुक
मुंबई : तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून करप्रणाली अधिक पारदर्शक, सुलभ आणि करदाताकेंद्रित बनवल्याबद्दल राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आयकर विभागाचे अभिनंदन केले. आयकर विभागाच्या १६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी, “एकेकाळी ‘भीतीदायक’ म्हणून ओळखला जाणारा आयकर विभाग आज ‘जनस्नेही मित्र’ बनला आहे,” असे गौरवोद्गार काढले.
राज्यपाल म्हणाले की, भारत ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना आयकर विभागाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत आहे. कर महसुलाच्या माध्यमातून सार्वजनिक शाळा, रुग्णालये, रस्ते, पायाभूत सुविधा तसेच विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी शक्य होत असून, देशाच्या सर्वांगीण विकासात आयकर विभागाचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील कौटिल्य भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला मुंबईचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आलोक कुमार तसेच अभिनेते विकी कौशल यांच्यासह आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.