पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील चिंबळी येथील लोखंडे वस्तीतील एका मोकळ्या पटांगणात घरगुती वापराच्या मोठ्या गॅस सिलेंडरमधून छोट्या व्यावसायिक गॅस टाक्यांमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग करणाऱ्या एका दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ११ जून) रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
गजानन रामराव पौळ (वय ४५, रा. लोखंडे वस्ती, चिंबळी, मूळ- परभणी) याला अटक केली आहे. पोलीस शिपाई अमित अनिल डिखळे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जीवनावश्यक वस्तू असलेल्या घरगुती वापराच्या सिलेंडरमधून गॅस ट्रान्सफर सर्किटच्या साहाय्याने छोट्या ४ किलोच्या टाक्यांमध्ये गॅस भरण्याचे बेकायदेशीर कृत्य केले. या कारवाईत पोलिसांनी ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.
गॅस रिफिलिंग करणाऱ्या दुकानदाराला अटक
