उष्णतेच्या लाटेचा वाढता धोका; कामगार, मजूर आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांची विशेष नियमावली लागू
पुणे –
पुणे जिल्ह्यात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून पुढील काही दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून कामगार आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी विशेष मार्गदर्शक सूचना जारी करत दुपारच्या कडक उन्हात काम टाळण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशासनाने उद्योग, कारखाने, बांधकाम क्षेत्र आणि असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र नियमावली लागू केली आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत उष्णतेचा सर्वाधिक प्रभाव जाणवत असल्याने या काळात कामाचे नियोजन बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कामगारांना थेट उन्हात दीर्घकाळ काम करावे लागू नये, यासाठी कंपन्या आणि ठेकेदारांना खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विश्रांतीसाठी सावलीची जागा, पंखे आणि थंडावा देणाऱ्या सुविधा उपलब्ध ठेवाव्यात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच उष्माघात किंवा तब्येत बिघडल्यास तातडीने उपचार मिळावेत यासाठी प्रथमोपचार पेटी, बर्फ आणि आवश्यक औषधे ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कारखाने आणि खाणींमध्ये ‘पेअर सिस्टम’ लागू करण्यावर भर देण्यात आला आहे. दोन कामगारांनी एकत्र काम केल्यास एकमेकांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवता येईल, असा प्रशासनाचा उद्देश आहे. आरोग्य विभागाशी समन्वय साधून कामगारांची नियमित तपासणी करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
बांधकाम मजूर, वीटभट्टी कामगार आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी विशेष जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. श्रमिक चौकांवर पोस्टर, बॅनर आणि माहितीपत्रकांच्या माध्यमातून उष्णतेपासून बचावाचे संदेश दिले जाणार आहेत.
धार्मिक उत्सव, ग्रामसभा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. दुपारच्या वेळेत मिरवणुका आणि मोठ्या सभा घेणे टाळावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक कार्यक्रमस्थळी आरोग्य कर्मचारी, पिण्याचे पाणी आणि ओआरएसची व्यवस्था करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “उष्णतेकडे दुर्लक्ष करू नका. भरपूर पाणी प्या. दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा,” असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. उष्माघात, डिहायड्रेशन आणि थकव्याच्या तक्रारी वाढत असल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.
