पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे दारू भट्ट्या लावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केल्यानंतर आता पोलिसांनी किरकोळ दारू विक्री करणाऱ्यांकडे आपला मोर्चाचे वळवला आहे. किरकोळ दारू विक्री केल्याप्रकरणी एका दिवसात पोलिसांनी २० गुन्हे दाखल करत त्यात २३ जणांवर गुन्हे दाखल केले. यासह दारू तयार करण्यासाठी भिजत घातलेले रसायन आणि ताडी विक्री प्रकरणी देखील कारवाई करत पोलिसांनी ११ महिलांसह एकूण २९ जणांवर २३ गुन्हे दाखल केले आहेत.
पिंपरी परिसरात चार, एमआयडीसी भोसरी, आळंदी, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी तीन, देहूरोड, दक्षिण चाकण, दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी दोन आणि चिंचवड, रावेत, हिंजवडी, सांगवी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक असे २३ गुन्हे दाखल झाले आहेत. किरकोळ दारू विक्री करणाऱ्यांमध्ये महिला देखील सहभागी आहेत.
पोलिसांच्या दारू विक्री, निर्मिती, वाहतूक प्रकरणी कारवाया नियमितपणे सुरु असतात. फुगेवाडी दापोडी येथील विषारी दारू प्रकरणानंतर पोलिसांनी सुरुवातीला दारू भट्ट्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले. दारू भट्ट्या उध्वस्त केल्यानंतर आता पोलिसांनी दारू विक्रीकडे मोर्चा वळवला आहे. दारूविक्रीच्या २० प्रकरणांमध्ये तब्बल ७०० लिटर दारू जप्त केली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी महात्मा फुले नगर येथे एका सलून मध्ये सुरु असलेल्या ताडी विक्री केंद्रावर कारवाई करत १०० लिटर ताडी जप्त केली. दक्षिण चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयाळी आणि नाणेकरवाडी येथे सुरु असलेल्या दोन दारुभट्ट्यांवर कारवाई करत २२०० लिटर रसायन नष्ट केले आहे.
एका दिवसात पोलिसांच्या २३ कारवाया दारू विक्री करणाऱ्या ११ महिलांसह २९ जणांवर गुन्हे दाखल
