पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – मुंबई-पुणे महामार्गावर कासारवाडी मेट्रो स्टेशनसमोर सोमवारी दुपारी भरधाव शिवाई बसने पुलाखाली थांबलेल्या दुचाकींना धडक दिली. पावसापासून बचाव करण्यासाठी आश्रय घेतलेल्या नागरिकांना बसने चिरडल्याने झालेल्या अपघातात चौघेजण जखमी झाले. यापैकी एकाची प्रकृती अत्यंत गंभीर असून, अपघातग्रस्त बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाच ते सहा दुचाकीस्वारांनी कासारवाडी मेट्रो स्टेशनच्या पुलाखाली आडोसा घेतला होता. याच वेळी मुंबईच्या दिशेने जाणारी शिवाई बस (एमएच १२ व्हीटी ११०४) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींवर थेट जाऊन धडकली. या अपघातात किरण वामन महाजन (वय ५६, रा. चिखली) हे गंभीर जखमी झाले असून, दिव्या रसूल ओबेरॉय (वय ४०, रा. भोसरी), हर्षल अब्दुल खान (वय ३९, रा. भवानी पेठ) आणि ऋषिकेश उत्तम हंद्राळे (वय २७, रा. धनकवडी) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच दापोडी पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली व वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी बसचालक भट्टू अर्जुन आयरे (वय ४३, रा. नाशिक) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कासारवाडी मेट्रो स्टेशनसमोर शिवाई बसचा भीषण अपघात; चौघे जखमी, एक गंभीर; दुचाकींचेही मोठे नुकसान
