पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक वस्तूंच्या वापराबाबत जनजागृती व्हावी तसेच त्यांना पर्यावरणपूरक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर करण्यात आले.
सध्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या जेवणाच्या डब्यांचा, पाण्याच्या बाटल्यांचा, कंपास पेट्यांचा आणि इतर साहित्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या वापरामुळे आरोग्य आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महानगरपालिका व शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शाळांमध्ये विशेष जनजागृती अभियान, व्याख्याने, स्पर्धा तसेच विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच पालिका शाळांमध्ये डीबीटी (DBT) किटद्वारे दिल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये प्लास्टिकऐवजी स्टील आणि पुनर्वापर करता येणाऱ्या पर्यावरणपूरक वस्तूंचा समावेश करण्याची सूचना करण्यात आली आहे.
पर्यावरण संरक्षण, विद्यार्थ्यांचे आरोग्य संवर्धन आणि स्वच्छ, हरित व सुंदर पिंपरी-चिंचवड शहर घडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
