लुईस : भारतीय नौदलाची अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका आयएनएस तरकश २० जून २०२६ रोजी आपल्या नियमित मोहिमेदरम्यान मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस येथे दाखल झाली. या भेटीमुळे भारत आणि मॉरिशस यांच्यातील सागरी सहकार्य अधिक दृढ होणार आहे.
या दौऱ्यादरम्यान मॉरिशस राष्ट्रीय तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी बंदर आणि सागरी निगराणी, अग्निशमन, नुकसान नियंत्रण, सागरी सुरक्षा तसेच नाविक कौशल्य यांसारख्या विषयांवर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. प्रादेशिक सागरी दलांच्या क्षमता विकासासाठी भारताच्या वचनबद्धतेचे हे उदाहरण मानले जात आहे.
दरम्यान, पोर्ट लुईस येथे मुक्कामादरम्यान आयएनएस तरकश सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना भारतीय नौदलाच्या कार्यपद्धतीची माहिती मिळण्याबरोबरच भारतीय नौसैनिकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार असून, परस्पर सद्भावना आणि सागरी जागरूकतेला चालना मिळणार आहे.
