पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – शिरगाव गावच्या हद्दीत पवना नदीच्या कडेला मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची दारू तयार करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. ही कारवाई रविवारी (दि. ३ मे) रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अतुल चितारे यांनी रविवारी (दि. ३ मे) रोजी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात एका महिला आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने शिरगावच्या हद्दीत पवना नदीच्या पात्राजवळ बेकायदेशीरपणे ८ हजार लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन दारू तयार करण्यासाठी भिजत घातले होते. जप्त केलेल्या या रसायनाची एकूण किंमत दोन लाख ८० हजार रुपये इतकी आहे. पोलीस पथक येताच महिला आरोपी तेथून पळून गेली. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
शिरगाव येथे पावणे तीन लाखांचे दारूचे रसायन नष्ट
