माळशेज घाट मार्ग खचला; मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश; पुणे-अहिल्यानगरहून जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
पुणे : कल्याण-माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर करंजाळे गावाजवळ रस्ता खचल्याने माळशेज घाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
माळशेज घाट परिसरात रस्ता खचल्यामुळे वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि कायदा-सुव्यवस्थेची समस्या उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे अहिल्यानगर, जुन्नर, आळेफाटा तसेच पुणे परिसरातून माळशेज घाट मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.
प्रशासनाने वाहनचालकांसाठी आळेफाटा – नारायणगाव – खेड – चाकण – तळेगाव एमआयडीसी – लोणावळा – खोपोली – मुंबई हा पर्यायी मार्ग निश्चित केला आहे. सर्व वाहनचालकांनी याच मार्गाचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित यंत्रणा रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेणार असून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच वाहतूक पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी माळशेज घाट मार्ग टाळून प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गाचाच वापर करावा, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले आहे.