पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – दिल्ली येथून बिमा लोकपाल बोलत असल्याचे सांगून ६० कोटी रुपयांची टर्म इन्शुरन्स पॉलिसी देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची ३० लाख २५ हजार ९२६ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना तळवडे येथील रुपीनगरमध्ये ५ डिसेंबर २०२४ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत घडली.
पंकज तिवारी (रा. ग्रेटर कैलाश, नवी दिल्ली) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंद्रजित विजयसिंह भोसले (वय ५१, रा. कोयना हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे, पुणे) यांनी मंगळवारी (दि. १६ जून) रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज तिवारी याने फिर्यादी भोसले यांना फोन करून ६० कोटी रुपयांची टर्म इन्शुरन्स पॉलिसी देण्याचे आमिष दाखवले. तसेच यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य कव्हर होतील आणि ॲडमिट झाल्यास तात्काळ २ ते ३ लाख रुपये मिळतील, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ३० लाख २५ हजार ९२६ रुपये ऑनलाइन जमा करून घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक साळुंखे करीत आहेत.
साठ कोटींच्या पॉलिसीचे आमिष दाखवून एकाची ३० लाखांची फसवणूक
