लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील अलीगंज परिसरातील एका कोचिंग सेंटरमध्ये सोमवारी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे कोचिंग सेंटर एका दुकानाच्या वरच्या मजल्यावर सुरू होते. आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी इमारतीवरून उड्या मारल्या. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस महासंचालक आणि अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांना घटनास्थळी जाऊन सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या दुर्घटनेच्या मुळाशी जाऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
