पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी आमदार अमित गोरखे आक्रमक!

भामा-आसखेडचे काम ९ ते १० महिन्यांत पूर्ण होणार; शासनाचे लेखी आश्वासन

विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे वेधले लक्ष; ८४ कोटींच्या दोन नव्या निविदा जाहीर

पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवड शहराला भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळवून देणाऱ्या जलवाहिनी प्रकल्पाच्या विलंबाबाबत भाजप आमदार अमित गोरखे यांनी विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे सरकारला धारेवर धरले. शहराचा पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पात चालढकल करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना शासनाने जुन्या वादग्रस्त ठेकेदाराला हटवून आता दोन नव्या निविदा काढून युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

​प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाने तब्बल ८४ कोटींच्या दोन नवीन निविदा काढल्या आहेत. यामध्ये नवलाख उंब्रे ते तळवडे दरम्यान गुरुत्वनलिका टाकण्याच्या कामासाठी ५० कोटी ६८ लाखांची निविदा काढून १० महिन्यांची मुदत दिली आहे, तर अशुद्ध जलउपसा केंद्र ते नवलाख उंब्रे दरम्यान रायझिंग मेन टाकण्यासाठी ३३ कोटी ३४ लाखांची निविदा काढून ९ महिन्यांची मुदत दिली आहे.

​”शहराचा विस्तार वेगाने होत असून नागरिकांना मुबलक पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. भामा-आसखेडच्या कामात झालेला विलंब खपवून घेतला जाणार नाही. आता शासनाने ९ ते १० महिन्यांची कडक मुदत देऊन काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. पिंपरी-चिंचवडकरांच्या घराघरात पाणी पोहोचेपर्यंत माझा हा पाठपुरावा अविरत सुरूच राहील.”
– आमदार अमित गोरखे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *