एफडीए नंतर महापालिकेचा टपऱ्यांवर हातोडा! ​विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि ‘तंबाखूमुक्त शैक्षणिक वातावरणासाठी’ महापालिकेची धडक मोहीम

पिंपरी-चिंचवड :
शहरातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शैक्षणिक संस्थांमधील निरोगी वातावरण अबाधित राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत मंगळवारी (दि. २३) शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातील अनधिकृत टपऱ्या, पानटपऱ्या आणि तत्सम अतिक्रमणांवर थेट बुलडोझर फिरवत विशेष मोहीम राबवली. या धडक कारवाईत तब्बल ३५ अनधिकृत टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.

​शहरातील ‘या’ प्रमुख शैक्षणिक परिसरात कारवाई
​महापालिकेच्या पथकाने शहरातील मोरवाडी, आकुर्डी, चिंचवड, जाधववाडी, भोसरी, इंद्रायणीनगर, खराळवाडी, लांडेवाडी, दापोडी, जुनी सांगवी, आणि थेरगाव आदी प्रमुख परिसरातील शाळा-महाविद्यालयांच्या शंभर मीटर परिघातील अनधिकृत टपऱ्यांची अचानक पाहणी केली. महापालिकेचा मोठा फौजफाटा पाहून अनेक टपरीधारकांनी कारवाईच्या भीतीने स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली. या मोहिमेमुळे शैक्षणिक परिसरातील अनधिकृत व्यावसायिक उपक्रमांना मोठा चाप बसला आहे.

तंबाखूमुक्त वातावरणासाठी कठोर पाऊल
​कारवाई ही केवळ रस्ते मोकळे करण्यापुरती मर्यादित नसून, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि व्यसनाधीनतेपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक व सार्वजनिक ठिकाणे तंबाखूमुक्त ठेवण्याबाबत वेळोवेळी कडक निर्देश दिले आहेत. याच निर्देशानुसार, शाळा-कॉलेजच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या किंवा विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या अशा अनधिकृत टपऱ्यांवर महापालिकेने हे कठोर पाऊल उचलले आहे.

​”विद्यार्थ्यांचे सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण राखणे ही महापालिकेची सर्वोच्च प्राथमिकता आहे. शाळा व महाविद्यालय परिसरातील अनधिकृत टपऱ्या आणि अतिक्रमणे हटवण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, यापुढील काळातही ही कारवाई अशीच सातत्याने आणि तीव्र गतीने सुरू राहील. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना सर्व संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *