पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – सायबर गुन्हेगारीच्या जगात मोठी खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सायबर चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. एका संघटित सायबर टोळीवर थेट ‘मोका’ अंतर्गत कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांवर मकोका लावण्याची ही आयुक्तालयातील पहिलीच वेळ आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे तब्बल ११ कोटी १३ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
तपासात आरोपी केवळ स्थानिक पातळीवर नव्हे, तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात होते. फसवणुकीची रक्कम ‘USDT’ (क्रिप्टोकरन्सी) सारख्या आभासी चलनात वर्ग करून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण केला होता. पोलिसांनी कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि राजस्थानमधील उदयपूर येथून अभय बाबासाहेब पाटील (रा. कोल्हापूर), शिवतेज राजेंद्र पोटे (रा. वाघोली, पुणे), युवराज उर्फ संतोष मुदलीयार (रा. लोहगाव, पुणे), रॉनी उर्फ पंकज गिरीगोस्वामी (रा. उदयपूर, राजस्थान), प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी (रा. उदयपूर, राजस्थान), उमेश लक्ष्मीलाल भट्ट (रा. राजस्थान), महेश करबसपा उडचणे (रा. दहिसर, मुंबई), राहुल बहारदुरप्रसाद मौर्य (रा. दहिसर, मुंबई), शेख अब्दुल रहिस (रा. औरंगाबाद) यांना अटक केली.
सायबर पोलिसांनी गोठविलेली वेगवेगळ्या बँक खात्यांमधील दोन कोटी ६५ लाख ७६ हजार रुपये मूळ फिर्यादींना परत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
—
शरिराविरुद्धच्या गुन्ह्यांप्रमाणेच सायबर गुन्हेगारही समाजासाठी मोठा धोका बनले आहेत. अशा संघटित टोळ्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आम्ही मोकासारख्या कठोर कायद्यांचा वापर करत आहोत.
– विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त
अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी या टोळीवर मकोका लावण्याचे आदेश पारित केले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक वैभव पाटील यांच्या पथकाने केली.
