मुंबई : अभिनेता आमिर खान यांच्या वैयक्तिक आयुष्यावरून महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार पलटवार करत, “आमिर खान यांनी तीन लग्न केली असतील, तर तुम्ही चार करा… तुम्हाला नेमकी जळजळ कशाची होते?” असा सवाल उपस्थित केला.
माध्यमांशी संवाद साधताना वारिस पठाण म्हणाले की, एखादी व्यक्ती आपल्या इच्छेनुसार विवाह करत असेल, तर त्यावर कोणालाही आक्षेप घेण्याचा अधिकार नाही. प्रत्येक नागरिकाला संविधानाने वैयक्तिक स्वातंत्र्य दिले असून, कोणाच्या खासगी आयुष्यावर राजकीय टिप्पणी करणे योग्य नाही. आमिर खान यांच्या वैयक्तिक निर्णयाचा राजकारणाशी कोणताही संबंध नसताना त्यावर भाष्य करून अनावश्यक वाद निर्माण केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पठाण यांनी पुढे सांगितले की, देशासमोर बेरोजगारी, महागाई, शेतकरी, शिक्षण आणि विकासासारखे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा वेळी एखाद्या कलाकाराच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा करण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांवर सरकारने लक्ष केंद्रित करावे. समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये टाळून जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आमिर खान यांच्या वैयक्तिक आयुष्यावरून सुरू झालेला हा वाद आता राजकीय रंग घेतोय
