मुंबई | प्रतिनिधी : राज्यात उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र शासनाने मागील वर्षापासून ‘राज्य महोत्सवा’चा दर्जा दिला आहे. यावर्षी या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप देत ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा’ राज्यापुरती मर्यादित न ठेवता देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यासह देश-विदेशातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आपल्या सामाजिक, सांस्कृतिक व लोकहिताच्या उपक्रमांचे सादरीकरण करून शासनाच्या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडळांचा गौरव करण्यात येणार असून, भरघोस बक्षिसेही प्रदान केली जाणार आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त २३ जुलै रोजी ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. याच कार्यक्रमातून ‘महागणेशोत्सव २०२६’ उपक्रमांचाही शुभारंभ करण्यात येणार आहे.
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुल येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, ती अकादमीच्या अधिकृत यूट्यूब वाहिनीवरून थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे. त्यामुळे जगभरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना ऑनलाइन माध्यमातून प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील तसेच देश-विदेशातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
