पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दि. १९ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास चाकण येथील पुणे-नाशिक रोडजवळ धाडगे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला करण्यात आली.
अली साजीद सिकिलकर (वय २०, रा. माळी चाकण, जि. पुणे) आणि संतोष कुमार मोहनलाल विश्वकर्मा (वय २६, रा. घाडगे मळा, चाकण, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांना अटक केली आहे. निखिल ऊर्फ दाद्या कांबळे, सलमान इनामदार, संकेत कौटकर आणि प्रवीण जाधव ऊर्फ बॉस यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार बाळू दुंदा मराडे यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे लक्ष्मीपुत्र बंगल्याच्या भिंतीशेजारी १८ हजार १०० रुपये किमतीचा एकूण ३५८ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बेकायदेशीरपणे बाळगताना सापडले. चाकण उत्तर पोलीस पुढील तपास करीत आहे.
. गांजासह दोघांना अटक; सहा जणांवर गुन्हा दाखल
