Mumbai-ट्रेलर रिलीजपूर्वीच ‘रामायण: पार्ट 1’ला पायरेसीचा फटका; रणबीर कपूरच्या श्रीराम अवताराची क्लिप व्हायरल.
मुंबई :
नितेश तिवारी दिग्दर्शित बहुचर्चित ‘रामायण: पार्ट 1’ या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच पायरेसीचा फटका बसला आहे. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या विशेष ‘प्रथम संकल्प’ कार्यक्रमादरम्यान कथितरित्या मोबाईलवर चित्रीत करण्यात आलेली सुमारे 1 मिनिट 28 सेकंदांची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
या व्हायरल क्लिपमध्ये भगवान श्रीरामांच्या भूमिकेतील रणबीर कपूरची दमदार एन्ट्री तसेच राजा दशरथांचे वचन पाळण्यासाठी वनवास स्वीकारण्याच्या प्रसंगाची झलक पाहायला मिळत असल्याचा दावा केला जात आहे. चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर येण्यापूर्वीच ही दृश्ये इंटरनेटवर लीक झाल्याने निर्मात्यांची चिंता वाढली आहे.
घटनेनंतर निर्माता नमित मल्होत्रा आणि चित्रपटाच्या कायदेशीर पथकाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. इंटरनेटवरील सर्व अवैध क्लिप हटवण्यासाठी प्रयत्न सुरू असून रेडिटवरील अनेक पोस्ट हटवण्यात आल्या आहेत. मात्र एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि इतर काही प्लॅटफॉर्मवर अद्याप काही क्लिप उपलब्ध असल्याने त्या हटवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना आणि चाहत्यांना लीक झालेल्या क्लिप पाहू किंवा शेअर करू नयेत, असे आवाहन केले आहे. तसेच 24 जुलै 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या अधिकृत हाय-डेफिनिशन ट्रेलरची प्रतीक्षा करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.