.​’चौकीत’ नाही आणि ‘चौकातही’ नाही; पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस गायब!

पोलीस ठाण्यांची संख्या वाढली, पण चौक्यांना कुलूप; आयुक्तांच्या आदेशाला अधिकाऱ्यांनीच दाखवली केराची टोपली

​पिंपरी-चिंचवड :
शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच शहरात नवीन पोलीस ठाण्यांची संख्याही वाढली आहे. मात्र, दुसरीकडे सर्वसामान्यांचा आधार असलेल्या ‘पोलीस चौक्या’ आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वीपासून चालत आलेली पोलीस चौक्यांची प्रथा जवळपास बंद पडली आहे. अधिकारी आणि अंमलदार पोलीस ठाण्यातच ठाण मांडून बसत असल्याने शहरातील चौक्यांना कायमचे कुलूप लागले आहे.

​आयुक्तांच्या आदेशाचा विसर
​काही महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तांनी एक महत्त्वाचा संदेश दिला होता. “पोलीस चौकीत नको, तर चौकात दिसा,” असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले होते. गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सद्यस्थिती पाहता पोलीस आता ‘चौकीतही’ नाहीत आणि ‘चौकातही’ दिसत नाहीत. आयुक्तांच्या या आदेशाला खुद्द त्यांच्याच खात्यातील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे.

​अधिकारी पोलीस ठाण्यात, चौक्या कुलुपात!
​चौकी परिसरामध्ये नियमित गस्त किंवा फिरती घेतली जात नाही. त्यामुळे अनेक पोलीस अधिकारी चौकीला कुलूप ठोकून थेट मुख्य पोलीस ठाण्यात जाऊन बसणे पसंत करतात. याचा थेट फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. किरकोळ तक्रारीसाठीही नागरिकांना आता किलोमीटर दूर असलेल्या पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. यामुळे त्रस्त झालेले नागरिक आता पोलीस चौक्यांकडे फिरकतच नसल्याचे विदारक चित्र आहे.

​नागरिकांचा सवाल: सुरक्षा कोणाच्या भरवशावर?
​अदृश्य गस्त: रात्रीच्या वेळी चौकाचौकात होणारी पोलिसांची गस्त आता गायब झाली आहे.
​गुन्हेगारांचे फावले: पोलीस चौक्या बंद असल्याने टवाळखोर आणि भाईगिरी करणाऱ्यांचे धाडस वाढले आहे.
​सामान्य हवालदिल: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना तातडीच्या मदतीसाठी हक्काची जागाच उरलेली नाही.

​खाकीचा धाक संपलाय का?
​पोलीस चौक्यांमध्ये शुकशुकाट असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे मनोबल वाढले आहे. चौकात पोलीसच दिसत नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहेच, शिवाय छेडछाडीचे प्रकारही वाढले आहेत. “आम्ही सुरक्षा मागायची कोणाकडे?” असा संतप्त सवाल पिंपरी-चिंचवडकर विचारत आहेत. आता तरी पोलीस आयुक्त या सुस्तावलेल्या यंत्रणेला जागे करून बंद चौक्यांचे कुलूप उघडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *