फीफा विश्वचषक 2026 स्पर्धेदरम्यान फीफाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरील “आता थांबायचं नाय…” या आशयाच्या पोस्टने भारतीय फुटबॉल चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मराठीतील या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, भारतीय चाहत्यांनी त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारताचा संघ अद्याप फीफा विश्वचषकासाठी पात्र ठरलेला नसला, तरी भारतीय फुटबॉलप्रेमींचा मोठा चाहता वर्ग लक्षात घेऊन फीफा विविध भारतीय भाषांमधून चाहत्यांशी संवाद साधत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भारतीय फुटबॉल चाहत्यांमध्ये नव्या आशा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
फीफाच्या या पोस्टने सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळवला असून, “भारतात फुटबॉलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे हे आणखी एक उदाहरण आहे,” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.
