Pandharpur-आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्धार
पंढरपूर : आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती माने या दाम्पत्यासमवेत श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यानंतर झालेल्या सत्कार समारंभात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंढरपूर मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प अडीच वर्षांत पूर्ण केला जाईल, अशी घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरपुरात येतात. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराचा विकास करणे अत्यावश्यक आहे. कोणावरही अन्याय न करता, सर्वांचे योग्य पुनर्वसन करून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. कॉरिडॉरमुळे स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना उत्तम सुविधा मिळतील आणि भाविकांसाठी अधिक सुसज्ज दर्शन व्यवस्था उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावर्षी वारीने नवा उच्चांक गाठत दर्शनासाठी तब्बल २५ किलोमीटरहून अधिक लांबीची रांग लागल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, एवढी मोठी गर्दी असूनही वारकरी विठ्ठलनामाच्या गजरात आनंदाने दर्शन घेत आहेत. चंद्रभागा नदीचे पाणी स्वच्छ राखण्यासाठी तसेच वाळवंटात भाविकांसाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी कल्याणाचा उल्लेख करत राज्य सरकारने ५६ लाख शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, कृषीपंपांना मोफत वीज तसेच थकीत वीजबिल माफी यांसारखे महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती दिली. वारकरी आणि शेतकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महापूजेनंतर मानाचे वारकरी दाम्पत्य बाबासाहेब माने व प्रभावती माने यांचा मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच एसटी महामंडळाच्या वतीने त्यांना वर्षभरासाठी मोफत प्रवास पास देण्यात आला.
यावेळी स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त वारी आणि जनजागृती करणाऱ्या दिंड्यांना ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रथम क्रमांक श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूर, द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान, जालना आणि तृतीय क्रमांक गोऱ्हेकर संस्था, आळंदी देवाची यांना पुरस्कार व धनादेश देण्यात आला.
कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, सुरेश खाडे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह मंदिर समितीचे सदस्य आणि विविध मान्यवर उपस्थित होते.