Mumbai-स्टुडंट प्रोटेस्टदरम्यान आकांक्षा पुरीचा मोठा दावा; ‘आंदोलनाचे मार्केटिंग करू नका, आम्हालाही संपर्क केला जात आहे’
मुंबई : बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री आकांक्षा पुरी हिने सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा दावा केला आहे. आंदोलनाचा वापर प्रसिद्धी आणि मार्केटिंगसाठी करू नये, असे आवाहन करत अनेक राजकीय पक्ष आणि व्यक्ती कलाकारांशी संपर्क साधत असल्याचा गौप्यस्फोट तिने केला.
आकांक्षा पुरी म्हणाली, “मला फक्त एवढंच वाटतं की लोकांनी योग्य गोष्टीची साथ द्यावी. या आंदोलनाचा मार्केटिंगसाठी वापर करू नये, त्यातून पैसे कमवू नयेत किंवा स्वतःची पोळी भाजू नये. योग्य मुद्दा आणि योग्य लोकांच्या पाठीशी उभं राहणं महत्त्वाचं आहे.”
तिने पुढे सांगितले की, “मी यापेक्षा अधिक काय बोलू? माझ्यासोबत असलेले अनेक कलाकार, अभिनेते आणि कंटेंट क्रिएटर्स यांना माहिती आहे की अनेक लोक आणि काही राजकीय पक्ष आमच्याशी संपर्क साधत आहेत. आंदोलनाचा भाग बनून प्रसिद्धी मिळवण्यासाठी, रॅलीत सहभागी होण्यासाठी आमच्यावर दबाव आणला जात आहे.”
आकांक्षा पुरीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिच्या विधानाची चर्चा रंगली आहे.