आठ लाखांची मागणी केल्याचा आरोप; तडजोडीनंतर तीन लाख स्वीकारताना रंगेहात कारवाई, पोलीस दलात खळबळ
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) :
दिघी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात ‘बी फायनल’ अहवाल सादर करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना महिला पोलीस फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने बुधवारी सायंकाळी रंगेहात पकडले. ही कारवाई थेट दिघी पोलीस ठाण्याच्या आवारात झाल्याने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मोठी खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या महिला पोलीस फौजदाराचे नाव चैताली बाबासाहेब गपाट (वय ४२, रा. ग्रँड बे सोसायटी, मांजरी, पुणे) असे आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास चैताली गपाट यांच्याकडे होता. या प्रकरणातील ३५ वर्षीय तक्रारदाराला मदत करून न्यायालयात ‘बी फायनल’ अहवाल सादर करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला आठ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची दखल घेत एसीबीच्या पथकाने १४ आणि १५ जुलै रोजी मागणीची पडताळणी केली. त्यावेळी तडजोडीनंतर तीन लाख रुपये स्वीकारण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर बुधवारी सायंकाळी सुमारे पावणेसहा वाजता दिघी पोलीस ठाण्याच्या आवारात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी चैताली गपाट यांना रंगेहात ताब्यात घेतले.
दिघी पोलीस ठाण्याच्या आवारातच ही कारवाई झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.
