एम्पायर स्टेट उड्डाणपुल परिसरात घटना; मानसिक तणावातून टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज
पिंपरी-चिंचवड :
पत्नीच्या गंभीर आजारपणामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून काळेवाडी येथील एका चालकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना चिंचवडमध्ये घडली. एम्पायर स्टेट उड्डाणपुल परिसरात ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सिकंदर मोहम्मद शेख (वय ४३, रा. काळेवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते चालक म्हणून काम करत होते. गुरुवारी सकाळी उड्डाणपुल परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच चिंचवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेची नोंद करून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पोलीसांच्या प्राथमिक चौकशीत मृत सिकंदर शेख हे गेल्या काही काळापासून मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पत्नी गंभीर आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. उपचार, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि त्यातून निर्माण झालेल्या चिंतेमुळे ते अस्वस्थ होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी त्यांच्या मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क साधला. कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. या प्रकरणात कोणताही संशयास्पद मुद्दा आहे का, याचाही तपास केला जात आहे.
चिंचवड पोलीसांच्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात मानसिक तणाव हे कारण असल्याचे दिसून येत असले तरी सर्व बाबींची पडताळणी सुरू आहे. उत्तरीय तपासणी अहवाल आणि नातेवाईकांचे जबाब प्राप्त झाल्यानंतर घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे काळेवाडी आणि चिंचवड परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
