सिग्नल तोडणारे, ट्रिपल सीट, नो-पार्किंग आणि फॅन्सी नंबर प्लेटधारकांवर सर्वाधिक कारवाई; नियमांचे पालन करण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन
पिंपरी-चिंचवड : शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांना आळा घालणे आणि वाहतुकीत शिस्त निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. १ जानेवारी ते ३० जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत वाहतूक शाखेने तब्बल ४ लाख १ हजार ७८७ वाहनचालकांवर कारवाई करत ४० कोटी ८३ लाख २९ हजार ९०० रुपयांचा दंड आकारला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार, सह पोलीस आयुक्त शशीकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. शहरातील प्रमुख चौक, महामार्ग, सेवा रस्ते आणि गर्दीच्या भागांमध्ये वाहतूक पोलिसांनी नियमित तपासणी करून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली.
वाहतूक शाखेच्या आकडेवारीनुसार, नो-पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने हटविण्यासाठी ६६ हजार २२३ टोईंग कारवाया करण्यात आल्या. त्यानंतर सिग्नल जम्पिंगच्या ५४ हजार ३३८, नो-एंट्रीत प्रवेश करणाऱ्या जड वाहनांच्या ४८ हजार २७०, वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ४३ हजार ५६७ आणि ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या ४० हजार ४१९ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या ३८ हजार ४१२ वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
याशिवाय विना हेल्मेट ३० हजार ८२५, ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या ५ हजार ९५९, काळी फिल्म लावलेल्या १८ हजार १७४, मॉडिफाईड सायलेंसर वापरणाऱ्या १७ हजार ५७४, मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या १२ हजार ३३४, रिक्षांवरील १८ हजार ४८६ आणि बसचालकांवरील ७ हजार २०६ कारवायांचा समावेश आहे.
या सर्व कारवायांमधून जड वाहनांवरील नियमभंगासाठी ६.५० कोटी, वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांकडून ४.५९ कोटी, सिग्नल जम्पिंगसाठी ४.३६ कोटी, ट्रिपल सीटसाठी ४.१२ कोटी, टोईंग कारवाईतून ३.५२ कोटी, फॅन्सी नंबर प्लेटसाठी ३.१८ कोटी, विना हेल्मेट ३.०७ कोटी आणि इतर नियमभंगातून मोठ्या प्रमाणावर दंडाची वसुली करण्यात आली.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. दंडात्मक तसेच न्यायालयीन कारवाई टाळण्यासाठी वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे. तसेच शहरातील वाहतूक कोंडी, वाहतूक नियमन किंवा अन्य तक्रारींसाठी वाहतूक पोलिसांच्या ‘ट्राफिक बडी’ व्हॉट्सॲप चॅटबॉट (८७८८६४९८८५) चा अधिकाधिक वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.
