१९ हजार वाहनचालकांवर कारवाई; ‘नो पार्किंग’, काळ्या काचा, मॉडिफाइड सायलेन्सर आणि तळीराम चालक रडारवर
पिंपरी-चिंचवड(pimpri chinchwad) : पिंपरी-चिंचवड शहरातील बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. अवघ्या १५ दिवसांत तब्बल १९ हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या विशेष मोहिमेतून १ कोटी ८५ लाख १३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या या कारवाईने नियम मोडणाऱ्या चालकांचे धाबे दणाणले आहेत.
औद्योगिक, आयटी आणि शैक्षणिक केंद्र म्हणून वेगाने वाढणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चाकण, भोसरी, तळेगाव, हिंजवडी, तळवडे, चिखली यांसारख्या भागांमध्ये दररोज लाखो वाहनांची वर्दळ असते. त्यातच पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, पुणे-मुंबई महामार्ग आणि मुंबई-बेंगळुरू महामार्ग शहरातून जात असल्याने वाहतुकीवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे.
वाहनांची संख्या वाढत असताना वाहतूक नियमांचे उल्लंघनही वाढले आहे. चुकीची पार्किंग, काळ्या काचा, मॉडिफाइड सायलेन्सर, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे आणि अवजड वाहनांचे नियमभंग यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने विशेष मोहीम हाती घेतली.
पोलीस उपायुक्त (वाहतूक) बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरभर तपासणी नाके उभारण्यात आले. प्रमुख चौक, महामार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष पथके तैनात करण्यात आली. या मोहिमेत सर्वाधिक कारवाई ‘नो पार्किंग’मध्ये वाहने उभी करणाऱ्यांवर झाली.
शहरातील विविध भागांमध्ये १० हजार ६०७ वाहनांवर ‘नो पार्किंग’ अंतर्गत कारवाई करण्यात आली. रस्त्यावर उभी केलेली वाहने वाहतुकीस मोठा अडथळा ठरत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
काळ्या काचा लावून फिरणाऱ्या वाहनचालकांनाही मोठा फटका बसला. अशा २ हजार ५६२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच मोठा आवाज करणारे मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या १ हजार १८ वाहनचालकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४ हजार ४४४ अवजड वाहनांवरही दंड ठोठावण्यात आला. शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले.
मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवरही पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. अशा ४०४ वाहनचालकांना थेट न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे हे स्वतःसह इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणारे कृत्य असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
शहरात वाहतूक शिस्त निर्माण करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार आहेत. नियम मोडणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा इशाराही वाहतूक विभागाने दिला आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतुकीस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
