पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोशी परिसरात छापा टाकून बेकायदेशीररित्या विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एका आरोपीला रंगेहात अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. १३ मे) रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई संतोष सपकाळ यांनी बुधवारी (दि. १३ मे) रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या कारवाईत दीपक वसंत जाधव (वय ४५, रा. बोऱ्हाडेवस्ती, मोशी) याला अटक केली आहे, तर पुरवठादार महिला दुर्गा पवार (रा. पेरुची बाग, ओटास्किम, पुणे) ही महिला अद्याप फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक जाधव हा आपल्या ताब्यात बेकायदेशीररित्या १६ हजार ५०० रुपये किमतीचा ३३० ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी बाळगून असताना मिळून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, हा गांजा त्याने दुर्गा पवार या महिलेकडून विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले. भोसरी एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
गांजा विक्री प्रकरणी एकाला अटक
