Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
पवनानगर, दि. २४-*पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
*धरण ९५ टक्के भरले; पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग ५ हजार क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता*मावळ तालुक्यासह पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातील वाढता पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज (शुक्रवार) सकाळी ९ वाजल्यापासून विद्युतगृहामार्फत पवना नदीपात्रात ८०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार नदीपात्रातील विसर्ग टप्प्याटप्प्याने ५ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पवना नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नदीपात्रात किंवा नदीकाठावर ठेवलेले शेती अवजारे, पंप, वाहने, जनावरे तसेच इतर साहित्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सततच्या पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“पावसाचे प्रमाण लक्षात घेता विसर्ग वाढविण्याबाबतची पूर्वकल्पना वेळोवेळी दिली जाईल. नदी खोऱ्यातील सर्व ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी आणि लाभधारकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी,” असे आवाहन पूर नियंत्रण कक्ष, पवना धरण प्रकल्प, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांनी केले आहे.