पुणे महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून १६ लाखांची फसवणूक

​पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – पुणे महानगरपालिकेत आयुक्‍तांचा प्रशासकीय सचिव असल्याचे भासवून, अनुकंपा तत्त्वावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवत एकाने सहा जणांची १६ लाख १८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. ही घटना ७ सप्टेंबर २०२४ ते २५ सप्टेंबर २०२४ दरम्यान पिंपरी चिंचवड मनपा कार्यालय परिसरात घडली.
​आशिष अशोक उबाळे (वय ३८, रा. गणेश गार्डन जवळ, दापोडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. किरण कृष्णात ठोंबरे (वय ४४, रा. उदमनगर, पिंपरी) यांनी बुधवारी (दि. १३ मे) रोजी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष उबाळे याने फिर्यादीची भेट घेऊन आपण पुणे महापालिकेत आयुक्तांचे प्रशासकीय सचिव असल्याचे सांगितले. पालिकेत क्लार्क आणि शिपाई पदाच्या अनुकंपा तत्‍त्‍वावरील सहा जागा रिक्त असून तुमच्या नातेवाईकांना तेथे नोकरी लावतो, असे आमिष त्याने दाखवले. फिर्यादीचे नातेवाईक आणि मित्र मिळून सहा जणांकडून त्याने वेळोवेळी पैसे उकळले, मात्र कोणालाही नोकरी दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठोंबरे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. संत तुकारामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आटवे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *