पवना धरणावर पावसाची बरसात, तरी पाणीसाठा ‘जैसे थे’; नेमके कुठे गायब झाले लाखो लिटर पाणी?

गेल्या वर्षी याच दिवशी ६४ टक्के साठा, यंदा अवघे १८.०२ टक्के; पिंपरी-चिंचवड करांची चिंता वाढली

मावळ :
पवना धरण परिसरात गेल्या २४ तासांत तब्बल ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. डोंगर-दऱ्यांतून पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, या सर्वानंतरही पवना धरणाच्या पाणीसाठ्यात झालेली वाढ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

कारण, एवढा पाऊस होऊनही धरणाच्या साठ्यात शून्य टक्के वाढ झाली आहे.

पवना धरणाच्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत ४२ मि.मी. पाऊस झाला आहे. तर १ जूनपासून आजपर्यंत एकूण ६५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मात्र, धरणातील जलसाठा वाढीचा आकडा अद्यापही शून्यावरच कायम आहे. त्यामुळे “पाऊस पडतोय तरी पाणी कुठे जातेय?” असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

यामागे एक महत्त्वाचे कारण असल्याचे जलसंपदा विभागातील सूत्रांनी सांगितले. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे धरण परिसरातील जमीन आणि पाणलोट क्षेत्र पूर्णपणे कोरडे पडले होते. त्यामुळे सुरुवातीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर जमिनीत मुरत आहे. डोंगर उतारांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत धरणात येण्यासाठी अद्याप जोरदार आणि सातत्यपूर्ण पावसाची आवश्यकता आहे.

गेल्या वर्षी 11 मे रोजी अवकाळी पावसाला सुरुवात झाली अवकाळी पाऊस सतत बरसत होता त्यामुळे गेल्या वर्षी पवना धरणांमध्ये 64% इतका पाणीसाठा होता.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची परिस्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. २४ जून २०२५ रोजी पवना धरणात तब्बल ६४ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, यंदा त्याच दिवशी धरणात केवळ १८.०२ टक्के साठा शिल्लक आहे. म्हणजेच वर्षभरात तब्बल ४६ टक्क्यांहून अधिकची तफावत निर्माण झाली आहे.
यामुळे पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील नागरिकांची चिंता वाढली आहे. कारण पवना धरण हे लाखो नागरिकांच्या पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्रोत आहे.

हवामान विभागाने पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष पवना धरणाच्या जलपातळीकडे लागले आहे. पुढील दोन दिवसांत जोरदार पाऊस झाला तर धरणातील साठा वाढण्यास सुरुवात होईल. अन्यथा यंदाचा पावसाळा प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढवणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *