लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या पुनर्विकासाबाबत विधानभवनात आढावा बैठक; परंपरा जपत शाश्वत तोडगा काढण्याचे निर्देश
मुंबई : श्री लक्ष्मीनारायण व्यायामशाळा, आखाडा चिंचपोकळी यांच्या पुनर्विकासानंतरही आखाड्याची ऐतिहासिक परंपरा आणि क्रीडा उपक्रम अबाधित राहावेत, यासाठी विधानभवन येथे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
यावेळी आखाड्याच्या जागेसंदर्भातील प्रश्नावर कायदेशीरदृष्ट्या सक्षम, व्यवहार्य आणि दीर्घकालीन हित लक्षात घेऊन मसुदा तयार करण्याचे निर्देश उपसभापती सचिन अहिर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पुनर्विकासामुळे आखाड्याची ओळख, परंपरा आणि खेळाडूंच्या सुविधा कोणत्याही परिस्थितीत बाधित होऊ नयेत, यावर बैठकीत भर देण्यात आला.
बैठकीला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त किरण दिघावकर, कार्यकारी अभियंता (विकास नियोजन) प्रशांत कामत, युवा सेवा विभागाचे उपसंचालक शेखर बांगर तसेच लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याचे विश्वस्त आणि सभासद उपस्थित होते.