मुंबई(mumbai)-मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार पलटवार केला आहे. फडणवीस यांच्या वक्तव्यातून त्यांचा अहंकार आणि विरोधकांबद्दलचा दृष्टिकोन पुन्हा एकदा समोर आला असल्याचा आरोप त्यांनी केला.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “मी मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत टीका केल्यानंतर त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ज्याला काही समजत नाही, अक्कल नाही, त्याच्यावर काय बोलायचे.’ हे वक्तव्य त्यांच्या अहंकारी वृत्तीचे द्योतक आहे.”
ते पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस ज्या विचारांच्या पठडीतून समोर आले आहेत, त्या विचारसरणीनुसार सर्व ज्ञान आमच्याकडेच आहे आणि आम्ही सोडून बाकी सर्वजण निर्बुद्ध आहेत, अशी मानसिकता त्यांच्यात दिसून येते. हाच हेका आणि श्रेष्ठत्वाचा भाव त्यांच्या वक्तव्यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.”
मिसिंग लिंक प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
