अपुऱ्या मनुष्यबळामुळे पालिकेचे नियंत्रण सुटले; कंत्राटी यंत्रणेचा ‘रामभरोसे’ कारभार
पिंपरी-चिंचवड :
औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील गल्लीबोळांपासून मुख्य रस्त्यांपर्यंत कुत्र्यांच्या टोळ्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे सामान्य नागरिकांसह शाळकरी मुले आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
टोळ्यांचा सुळसुळाट
पिंपरी, चिंचवड, भोसरी, काळेवाडी, रहाटणी, निगडी आणि चिखली परिसरात कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. रात्रीच्या वेळी हे कुत्रे अधिक आक्रमक होतात. एकट्या-दुकट्या नागरिकाचा पाठलाग करणे, अंगावर धावून जाणे अशा घटना नित्याच्या झाल्या आहेत. शहरातील अनेक शासकीय कार्यालये आणि रुग्णालयांच्या परिसरातही कुत्र्यांचा वावर वाढला आहे.
प्रशासनाचे अपुरे मनुष्यबळ
महापालिकेचा पशुवैद्यकीय विभाग केवळ नावालाच उरला आहे. संपूर्ण शहरासाठी हाताच्या बोटावर मोजणे इतकेच अधिकारी व कर्मचारी आहेत. इतक्या मोठ्या शहराचा भार या अल्प कर्मचाऱ्यांवर आहे. कुत्रे पकडण्याचे काम खासगी कंत्राटदाराला दिले आहे. मात्र, त्यांच्याकडेही पुरेशी साधनसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध नाही. परिणामी, नसबंदी मोहीम केवळ कागदावरच प्रभावी दिसत आहे.
मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुले आणि वृद्ध सर्वाधिक जखमी होत आहेत. शाळा भरताना आणि सुटताना पालकांना मुलांची सतत चिंता लागलेली असते. दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे धावत असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. आरोग्य केंद्रांमधील आकडेवारीनुसार, दरमहा अनेक नागरिक श्वानदंशावर उपचार घेण्यासाठी येत आहेत.
महापालिकेचे नियोजन
शहरातील काही भागांमध्ये नवीन ‘शेल्टर हाऊस’ उभारण्याचा मानस आहे. या ठिकाणी काही कुत्र्यांची सोय असेल. येथे कुत्र्यांवर उपचार, नसबंदी आणि लसीकरण केले जाईल. जखमी कुत्र्यांची निगा राखण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.
नागरिकांचा आक्रमक पवित्रा
“महापालिकेने केवळ कंत्राटी पद्धतीवर अवलंबून न राहता स्वतःची सक्षम यंत्रणा उभी करावी,” अशी मागणी नागरिक करत आहेत. तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाबद्दल नाराजी आहे. तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.
श्वान प्रेमी आणि नागरिकांमध्ये बाचाबाची
काही दिवसांपूर्वी चिंचवड स्टेशन येथील एम्पायर इस्टेटमधील श्वानाना खायला देण्यावरून श्वानप्रेमी आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. हे प्रकरण मिटवण्यासाठी महापौर दालनात बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीतही श्वानप्रेमी आणि नागरिक यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. अशाच प्रकारच्या घटना शहरातील विविध भागात घडत असून यातून श्वानप्रेमींकडून पोलिसात तक्रार दिली जाते.
याकडेही हवे प्रशासनाचे लक्ष
– रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून चालणे झाले कठीण.
– दुचाकीस्वारांच्या मागे धावणाऱ्या कुत्र्यांमुळे अपघातांचे भय.
– पालिकेच्या यंत्रणेत कर्मचाऱ्यांचा प्रचंड तुटवडा.
