धक्कादायक…! चिंचवडच्या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तूंची विक्री? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेतील प्रकाराचा दावा; नागरिकांमध्ये संताप

पिंपरी–चिंचवड :
चिंचवड येथील श्री मोरया गोसावी मंदिराजवळ संकष्टी चतुर्थीनिमित्त भरणाऱ्या यात्रेत कथितपणे ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तू विक्रीसाठी आल्याचा दावा एका महिलेने केला आहे. या संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

व्हिडिओमध्ये संबंधित महिला यात्रेतून खरेदी केलेली चादर दाखवत आहे. चादर धुतल्यानंतर तिच्या एका कोपऱ्यात लपविण्यात आलेले लेबल आढळल्याचे ती सांगते. त्या लेबलवर ‘Made in Pakistan’ असा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या घटनेनंतर स्थानिक बाजारपेठांमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या उगमाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यात्रेत आणि रस्त्यावरील स्टॉलवर विकल्या जाणाऱ्या वस्तूंची तपासणी होते का, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

व्हिडिओमध्ये संबंधित महिलेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशात पाकिस्तानी वस्तूंवर विविध प्रकारचे निर्बंध असताना अशा वस्तू स्थानिक बाजारात कशा पोहोचतात, असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. काहींनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर काहींनी वस्तूंच्या लेबलची पडताळणी करूनच निष्कर्ष काढण्याची भूमिका घेतली आहे.
नागरिकांनी कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी तिच्यावरील उत्पादन तपशील, उत्पादक कंपनीचे नाव आणि मूळ देश याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

या प्रकरणातील व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी संबंधित वस्तू नेमकी कुठून आली, ती अधिकृतपणे आयात झाली होती की नाही, तसेच विक्रेत्याची बाजू काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *