पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड भरतानाचे चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देत एका पोलीस कर्मचाऱ्याकडे ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भुजबळ चौक येथील वाकड वाहतूक शाखेमध्ये घडली.
पोलीस अंमलदार कॉन्स्टेबल मच्छिंद्र बारामते यांनी गुरुवारी (दि. १७ एप्रिल) रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरद मनोज चव्हाण (रा. विद्युत कॉलनी, कन्नड, संभाजीनगर), विश्वजीत (वय १९) आणि अर्थव क्षीरसागर (वय १९) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी वरद चव्हाण याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस अंमलदार बारामते हे वाकड वाहतूक विभागात कार्यरत आहेत. आरोपी वरद चव्हाण याच्या मोटारसायकलवर १३ हजार रुपयांचा दंड प्रलंबित होता. वाहतूक पोलिसांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास भुजबळ चौकात त्याची गाडी पकडली. दंड खूप असल्याने त्यातील किमान एक हजार रुपये तरी दंड भरावा, असे आरोपी वरद याला सांगण्यात आले. एक हजार रुपये दंड भरताना आरोपींनी वाहतूक पोलीस बारामते यांचे व्हिडिओ चित्रीकरण केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी बारामते यांच्याकडे ५० हजार रुपये आणि आरोपीच्या गाडीवरील १३ हजार रुपयांचा दंड भरण्याची मागणी केली. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
वाहतूक पोलिसाकडे मागितली ५० हजारांची खंडणी
