अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत मोठा दावा केला आहे. अमेरिकेच्या तीव्र लष्करी कारवाईनंतर इराणच्या प्रतिनिधींनी चर्चेसाठी संपर्क साधत शस्त्रसंधीबाबत विनंती केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. मात्र, या दाव्याला इराणकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील जहाजांवर हल्ले करून इराणने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यानंतर अमेरिकेने इराणमधील ८० हून अधिक ठिकाणांवर लष्करी कारवाई केली. या हल्ल्यांमध्ये वीज प्रकल्प, रेल्वे उड्डाणपूल, लष्करी तळ आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, अमेरिकेने पहिल्यांदाच बंदर अब्बास परिसरावर थेट क्षेपणास्त्र हल्ला केल्याचेही सांगितले जात आहे.
दरम्यान, इराणनेही अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले करून प्रत्युत्तर दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
