थेरगाव येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणाने फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला जिवे मारण्याचा प्रयत्न करत चाकूने गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (११ जुलै) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास थेरगाव येथील पवारनगर येथे घडली.
या प्रकरणात अविनाश अजिनाथ बाबर (४३, आदर्श कॉलनी नंबर ४, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभि उर्फ अभिषेक कोळेकर (२५, पडवळनगर, थेरगाव, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्टर विजय भोईर हे बिगारी कामासाठी लेबर शोधत असताना मोटारसायकलवर बसले होते. त्यावेळी आरोपीने मागील आठ दिवसांपूर्वी झालेल्या भांडणात फिर्यादीच्या मुलाने मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून वाद घातला. आरोपीने “तुझ्या पोराच्या आधी तुझेच मुंडके कापतो” असे म्हणून धारदार चाकूने फिर्यादीवर आणि विजय भोईर यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले व जिवे मारण्याचा प्रयत्न केला. वाकड पोलीस तपास करत आहेत.
