अपघाताच्या कारणावरून कारची तोडफोड करत दोघांना मारहाण

पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – दुचाकी कारला धडकल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तिघांनी मिळून कारमधील प्रवाशांना दगड आणि काचेच्या ग्लासने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. २१ एप्रिल) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चिखली येथील पूर्णानगरमधील भोसले पंपा समोरील यू-टर्नवर घडली.
सिद्धांत गणेश यादव (वय २२, कुदळवाडी, चिखली) यांनी मंगळवारी (दि. २१ एप्रिल) रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सौद सामानी अब्दुल मतीन (वय २०, मोरवाडी गावठाण, पिंपरी) आणि त्‍याच्‍या दोन अल्‍पवयीन साथीदारांच्‍या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सौद याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दीड वाजताच्‍या सुमारास पूर्णानगर, चिखली येथे फिर्यादीच्या इनोवा कारला आरोपीची दुचाकी धडकली, यावरून वाद झाला. आरोपींनी शिवीगाळ करत हातातील कड्याने, दगडाने व काचेच्या ग्लासने मारहाण केली. यामध्ये फिर्यादीचे मित्र ऋषिकेश अशोक वहीले हे गंभीर जखमी झाले असून ध्रुव सोनी हे किरकोळ जखमी झाले आहेत. चिखली पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *