घरात घुसून दोन महिलांना मारहाण
पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – निगडी येथील ओटा स्कीम परिसरात ओळखीच्या तरुणाने घरात घुसून दोन बहिणींना मारहाण केली. ही घटना 25 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास संग्राम नगर झोपडपट्टी, निगडी येथे घडली.
पांडुरंग चंद्रकांत जाधव (वय 28, रा. वडारवाडी, शिवाजीनगर, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अंजू बापू शेलार (वय 30, रा. पत्रा शेड, संग्राम नगर झोपडपट्टी, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या घरात घुसून माझ्यासोबत शिवाजीनगर येथे राहण्यास चल असे म्हटले. फिर्यादीने नकार दिल्याने संतप्त झालेल्या आरोपीने फिर्यादी व तिच्या बहिणीला शिवीगाळ करत मारहाण केली, नख्यांनी ओरबाडले, कपाळ जमिनीवर आपटले, पाठीवर चावा घेतला आणि लाकडी दांडक्याने मारून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.