Jerusalem-वेस्ट बँकमध्ये हिंसाचार भडकला; इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चकमक, सहा जणांचा मृत्यू
जेरुसलेम : पॅलेस्टिनी बहुल वेस्ट बँकमधील नाब्लूसजवळील ताल गावात इस्रायली सैनिक, ज्यू वसाहतवादी (सेटलर्स) आणि पॅलेस्टिनी नागरिक यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षात चार पॅलेस्टिनी नागरिक आणि दोन इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने वेस्ट बँकमध्ये वसवलेल्या ज्यू सेटलर्स आणि स्थानिक पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये झालेल्या वादातून संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या इस्रायली सैनिकांनीही कारवाई सुरू केल्याने परिस्थिती अधिकच चिघळली. दोन्ही बाजूंमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात सहा जणांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर इस्रायली लष्कराने परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त फौज तैनात केली असून, हिंसाचारात सहभागी असल्याचा संशय असलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांविरोधात शोधमोहीम सुरू केली आहे.
दरम्यान, अमेरिकेने ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या इजिप्तच्या मुस्लिम ब्रदरहूडचे नेते महमूद अल-अबयारी आणि हमासच्या लष्करी शाखेसाठी निधी उभारल्याचा आरोप असलेल्या आणखी तीन जणांवर निर्बंध लादल्याची माहिती समोर आली आहे.