Delhi-जंतर-मंतर आंदोलनात पॅलेट गन वापरली का? सीआरपीएफकडून चौकशी; राहुल गांधींचा गंभीर आरोप
नवी दिल्ली : 20 जुलै रोजी दिल्लीतील संसद मोर्चादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईवरून नवा वाद निर्माण झाला आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्जसोबतच पॅलेट गनचाही वापर केल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आंदोलनस्थळी तैनात असलेल्या रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि सीआरपीएफ यांच्या भूमिकेची पडताळणी केली जात असून, प्रत्यक्षात पॅलेट गनचा वापर झाला होता की नाही, याची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप करत आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या एका तरुणाला माध्यमांसमोर आणले. हा तरुण तिरंगा हातात घेऊन शांततापूर्ण आंदोलन करत असताना त्याच्यावर पॅलेट गनचा मारा झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले, “सरकार पॅलेट गनचा वापर झालेला नसल्याचे सांगत आहे. मात्र या तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची दृष्टी गेली आहे. हजारो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि पॅलेट गनचा वापर करण्यात आला.”
या आरोपांनंतर पॅलेट गन वापराच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले असून, चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.