Mumbai-दादरमधील आंदोलनादरम्यान महिला आंदोलकाशी गैरवर्तनाचा आरोप; व्हायरल व्हिडिओवरून मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण
मुंबई : दादर परिसरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये साध्या वेशातील एका पोलिस अधिकाऱ्याने महिला आंदोलकाला अयोग्य पद्धतीने पकडल्याचा, ओढल्याचा आणि तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत पोलिस अधिकाऱ्याच्या वर्तनावर आक्षेप घेतला. मुख्यमंत्री यांना उद्देशून त्यांनी विचारले की, महिला आंदोलकांशी अशा प्रकारे पुरुष पोलिस कर्मचारी का वागत आहेत? अशा कारवाईसाठी महिला पोलिसांची नियुक्ती का करण्यात आली नाही? संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, वाद वाढल्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, संबंधित अधिकारी एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना संबंधित महिला मध्ये आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हिडिओची तपासणी केली असून संबंधित पोलिस अधिकाऱ्याच्या वर्तनात कोणतीही गैरप्रकाराची बाब आढळली नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
या घटनेमुळे आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, व्हायरल व्हिडिओ आणि पोलिसांच्या स्पष्टीकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.