​’तुझा मुलगा घराकडे का बघतोय?’ विचारणे पडले महागात; संतापलेल्या शेजारणींनी महिलेचे फोडले डोके

पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – शेजारी राहणाऱ्या महिलेच्या मुलाला ‘घराकडे का बघतोय’ असा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन महिलांनी एका ३० वर्षीय विवाहितेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता, संतापाच्या भरात त्यांनी पीडित महिलेच्या डोक्यात दगड घालून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना पिंपरीतील भारतनगर परिसरात घडली आहे.
​या प्रकरणी रिंना रंदिवे (वय ४५ अंदाजे) आणि निशा (पूर्ण नाव माहीत नाही, दोघी रा. भारतनगर, पिंपरी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ममताकोर करणसिंग जुनी (वय ३०, रा. भारतनगर रेल्वे स्टेशन शेजारी, पिंपरी) यांनी या संदर्भात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

​नेमकी घटना काय?
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास ममताकोर यांच्या घरासमोर राहणाऱ्या सारिका नावाच्या महिलेचा मुलगा त्यांच्या घराकडे बघत होता. ममताकोर यांनी त्याला “तू माझ्या घराकडे का बघत आहेस?” असे विचारले. या साध्या विचारणेचा राग मनात धरून शेजारी राहणाऱ्या आरोपी रिंना आणि निशा यांनी ममताकोर यांच्याशी वाद उकरून काढला.

शिवीगाळ आणि दगडाने मारहाण
​हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी महिलांनी ममताकोर यांना घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याच दरम्यान एका आरोपीने जवळच असलेला दगड उचलून ममताकोर यांच्या डोक्यात मारला, ज्यामध्ये त्या रक्तबंबाळ झाल्या.
​या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला असून, आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
​पुढील तपास पोलीस हवालदार पवार करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *